September 8, 2026 08:18 PM
मुंबई : भारतातील डिजिटल व्यवहारांच्या पलीकडे आता 'यूपीआय'चा विस्तार भारताशी व्यापार करणाऱ्या देशांमध्ये करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहणार आहे. भारत-सिंगापूरदरम्यान यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करणे दोन भारतीय शहरांमधील व्यवहाराइतकेच सुलभ झाले असून, याच धर्तीवर भारताशी व्यावसायिक संबंध असलेल्या अन्य देशांमध्येही यूपीआयचे जाळे विस्तारण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुंबईत मांडली. 'यूपीआय' हा भारताच्या फिनटेक क्षेत्रातील परिवर्तनाचा प्रमुख आधार असून, त्याचा उल्लेख केल्याशिवाय भारताची फिनटेक कहाणीच अपूर्ण राहते, असे मोदी यांनी स्पष्ट केले. (Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (८ सप्टेंबर) बीकेसी येथील 'जिओ वर्ल्ड' सेंटरमध्ये 'ग्लोबल फिनटेक फेस्ट' २०२६ चे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. या जागतिक फिनटेक महोत्सवाची सातवी आवृत्ती ८ ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याला जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोदी यांनी भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील यूपीआयच्या भूमिकेचा विशेष उल्लेख केला. २५ ऑगस्ट रोजी यूपीआयने दहा वर्षे पूर्ण केली. दहा वर्षांपूर्वी 'तुमची बँक तुमच्या हातात असेल' असे सांगितले असता अनेकांना ते अशक्य वाटत होते, अशी आठवण मोदी यांनी करून दिली. यूपीआयमुळे आर्थिक सेवा अधिक सुलभ आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. (Narendra Modi)
यूपीआयचा विस्तार आता देशांतर्गत व्यवहारांपुरता मर्यादित न ठेवता भारताशी व्यापार करणाऱ्या देशांपर्यंत करण्याची गरज मोदी यांनी अधोरेखित केली. भारत आणि सिंगापूरमधील यूपीआय जोडणीचे उदाहरण देताना दोन्ही देशांतील व्यवहार दोन भारतीय शहरांमधील व्यवहाराइतके सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले. यूपीआयला त्यांनी 'सभ्यताविषयक कथा' असे संबोधत त्याच्या जागतिक विस्ताराचे महत्त्व स्पष्ट केले. दरम्यान, जागतिक पातळीवर संघर्ष, अनिश्चितता, ऊर्जा व पुरवठा साखळीवरील दबाव आणि व्यापारातील तणावाचे वातावरण असतानाही भारताने एप्रिल-जून तिमाहीत ७.८ टक्के आर्थिक वाढ नोंदविल्याचे मोदी यांनी सांगितले. अशा परिस्थितीत भारताची वाढ जगासाठी नव्या आशेचे संकेत देत असल्याचे ते म्हणाले. (Narendra Modi)
भारताच्या सार्वभौम पतमानांकनातील सुधारणेकडेही मोदी यांनी लक्ष वेधले. जपानच्या पतमानांकन संस्थेने अलीकडे भारताचे सार्वभौम पतमानांकन 'ए' श्रेणीत सुधारले असून, तब्बल तीन दशकांनंतर झालेली ही सुधारणा असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या आर्थिक वाढीचा वेग, व्यापक आर्थिक स्थैर्य आणि गेल्या काही वर्षांतील संरचनात्मक सुधारणांवरील जागतिक विश्वासाचे हे द्योतक असल्याचा दावा मोदी यांनी केला. (Narendra Modi)
मोदींनी केले गणरायाला वंदन
'ग्लोबल फिनटेक फेस्ट'ला प्रत्येक वेळी येताना अधिक ऊर्जा मिळते, तरुणांचा वाढता सहभाग आणि नव्या संधींचा विस्तार जाणवतो, असेही मोदी म्हणाले. भारताची जोखीम घेण्याची क्षमता वाढत असून अनेकांची स्वप्ने प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदाच्या फिनटेक फेस्टची संकल्पना 'पोटेन्शियल टू इम्पॅक्ट : एजंटिक एआय, टोकनायझेशन, क्वांटम-ट्रस्टेड, कनेक्टेड, ग्लोबल सिस्टिम्स फॉर इन्क्लुझिव्ह फायनान्स' अशी आहे. महाराष्ट्रासह देशभरात काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होणार असल्याचा उल्लेख करून मोदी यांनी गणरायाला वंदन करत फिनटेक फेस्टसाठी शुभेच्छाही दिल्या.
(0)Comments