बंगळूरुमधील एका उद्योजकाने आपला एक अनुभव शेअर केला आहे, ज्यामुळे काम, आराम आणि व्यवसाय चालवण्याचं प्रेशर याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. तब्बल चार महिने आयसीयूमध्ये (ICU) घालवल्यानंतर त्यांना आयुष्याचा खरा अर्थ समजला. MillD चे सह-संस्थापक आणि Briyas चे संस्थापक असलेल्या शिवराम ब्रियास यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. यशस्वी उद्योजकांनी नेहमी कामासाठी उपलब्ध असलंच पाहिजे, असा त्यांचा आधी समज होता. त्यांची ही पोस्ट सध्या अनेक प्रोफेशनल्सना आपलीशी वाटली आणि यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
शिवराम सांगतात की, त्यांच्यासाठी रविवार म्हणजे सोमवारपेक्षा थोडा कमी कामाचा दिवस, इतकंच. ते रविवारीही फोन कॉल्स घेत, आपल्या फॅक्टरीला भेट देत आणि घरच्यांना 'थोड्या वेळात येतो' असं सांगून अनेक तास तिथेच थांबत.
"माझ्या करिअरमध्ये बहुतेक वेळा रविवार म्हणजे सोमवारपेक्षा थोडा कमी कामाचा दिवस होता," असं त्यांनी लिहिलं आहे.
एवढंच नाही, तर आपण नेहमी कामासाठी उपलब्ध असतो याचा त्यांना अभिमान वाटायचा. कारण त्यांच्या मते, खरी सुट्टी घेणं हे उद्योजकांच्या कामात बसत नाही.
पण चार महिने आयसीयूमध्ये काढल्यानंतर त्यांची ही मानसिकता पूर्णपणे बदलली.
त्या काळाची आठवण काढताना शिवराम म्हणतात, "मला माझ्या सगळ्या सुट्ट्या एकदमच मिळाल्या." या अनुभवाने त्यांना त्यांच्या जीवनशैलीचा आणि कामाच्या पद्धतीचा पुन्हा विचार करण्यास भाग पाडलं.
रिकव्हरीच्या काळात डॉक्टरांनी त्यांना समजावलं की, जेव्हा शरीर तणावाखाली असतं, तेव्हा ते मजबूत होत नाही. उलट, त्यानंतर मिळणाऱ्या विश्रांतीमध्ये शरीर स्वतःला बरं करतं.
"शस्त्रक्रिया म्हणजे शरीराला एक प्रकारचा धक्का असतो. खरी रिकव्हरी तर त्यानंतरच्या विश्रांतीत, खाण्यापिण्यात आणि शांत राहण्यात होते," असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
शिवराम म्हणतात की, डॉक्टरांचा हा सल्ला ऐकल्यावर त्यांना जाणवलं की, फूड इंडस्ट्रीमध्ये अनेक दशकं काम करूनही त्यांनी हे तत्त्व कधीच आपल्या व्यवसायात लागू केलं नाही.
आता त्यांना विश्वास आहे की, व्यवसायातील काही सर्वोत्तम कल्पना मीटिंग रूम्स आणि स्प्रेडशीटपासून दूर असतानाच सुचतात.
त्यांच्या मते, मीटिंगनंतर थोडं चालल्याने विचार अधिक स्पष्ट होतात, तर रविवारी कुटुंबासोबत जेवताना निरीक्षण केल्यास ग्राहक प्रत्यक्षात कसे खातात याबद्दल महत्त्वाचे इनसाइट्स मिळू शकतात.
"मोठी झेप घेण्यासाठी मोकळ्या वेळेची गरज असते," असं ते लिहितात.
विश्रांतीबद्दलचा दृष्टिकोन बदलला असला तरी, कामाबद्दलची त्यांची आवड कमी झालेली नाही, असं शिवराम स्पष्ट करतात. उलट, आता ते अधिक उद्देशाने आणि विचारपूर्वक काम करतात. फक्त व्यस्त राहण्याऐवजी वेळेचा योग्य वापर करतात.
ते सांगतात की, आता ते शक्यतोवर आपले रविवार जपतात. विश्रांतीला यशानंतर मिळणारं बक्षीस न मानता, चांगलं काम करण्याचा एक महत्त्वाचा भाग मानतात.
अर्थात, कधीकधी तातडीची कामं येतात, पण आता ती त्यांच्या रोजच्या रूटीनचा भाग राहिलेली नाहीत.
कामाच्या ताणामुळे येणाऱ्या थकव्यावर (burnout) सध्या मोठी चर्चा सुरू आहे. अशातच, शिवराम यांची ही गोष्ट एक उत्तम उदाहरण ठरली आहे. आरोग्याच्या एका मोठ्या संकटामुळे कामाच्या आणि वैयक्तिक आयुष्यातील प्राधान्यक्रम कसे बदलू शकतात, हेच यातून दिसतं.
(0)Comments