राज्यस्तरीय कृती दलाच्या अध्यक्षपदी डॉ.नीलम गोऱ्हे,आ.उमा खापरे सदस्या
प्रतिनिधी
पिंपरी:राज्यातील स्त्रीभ्रूण हत्या आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी तसेच जन्मावेळच्या लिंग गुणोत्तरात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय कृती दलाची मंगळवारी (ता.८)स्थापना केली.त्याच्या अध्यक्षपदी विधानपरिषद सदस्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दलाच्या आठ महिला सदस्य आमदारांपैकी ६ विधान परिषदेतील असून त्यात पिंपरी-चिंचवडकर उमा खापरे यांचा समावेश आहे.
राज्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे अधिनियम अर्थात PCPNDT Act आणि वैद्यकीय गर्भपात अधिनियम अर्थात MTP Act मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याची काही प्रकरणे निदर्शनास आली आहेत. या पार्श्वभूमीवर सोनोग्राफी केंद्रे, तत्सम निदान केंद्रे आणि वैद्यकीय गर्भपात केंद्रांवर प्रभावी देखरेख ठेवून विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी हे कृती दल स्थापन करण्यात आले आहे.त्यात विधानपरिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव, भावना गवळी, चित्रा वाघ, उमा खापरे, डॉ. मनीषा कायंदे तसेच विधानसभा सदस्या स्नेहा दुबे पंडित आणि श्वेता महाले यांचा समावेश आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे येथील अतिरिक्त संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
कृती दल राज्यातील विविध जिल्हे आणि महापालिका क्षेत्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन PCPNDT व MTP कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांसह सोनोग्राफी आणि वैद्यकीय गर्भपात केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणीही करणार आहे.तेथे कायद्याचे उल्लंघन आढळल्यास सबंधित यंत्रणांना कारवाई करण्याचे आदेश देण्याचे अधिकार या कृती दलाला देण्यात आले आहेत.तसेच कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाला शिफारशी करणे, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठका घेणे तसेच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जनजागृतीच्या उपाययोजना सुचविण्याचे कामही ते करणार आहे.ते प्रत्येक तीन महिन्यांनी निरीक्षणे आणि शिफारशींचा अहवाल सार्वजनिक आरोग्य विभागाला सादर करणार आहे.
(0)Comments